तानसा नदीकाठाजवळ वसलेले वज्रेश्वरी हे ठिकाण ठाण्यापासून सु. ४२ किमी., तर भिवंडीपासून उत्तरेस १९ किमी. अंतरावर आहे. याचे मूळ नाव वडवली असून गावातील वज्राबाई किंवा वज्रेश्वरी देवीच्या मंदिरावरून गावाचे वज्रेश्वरी हे नाव पडलेले आहे. वज्रेश्वरी ह्या नावाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. सिंहमार व कलिकाल या दोन असुरांच्या त्रासापासून मुक्ती मिळविण्यासाठी देवीची कृपा संपादन करावी म्हणून वसिष्ठ ऋषींनी येथे एक यज्ञ सुरू केला. यज्ञात सर्व देवतांना हविर्भाग मिळाला, पण इंद्राला तो दिला गेला नाही. त्यामुळे इंद्राने रागावून वसिष्ठावर आपले वज्र फेकले. तेव्हा पार्वतीने प्रकट होऊन ते वज्र गिळून टाकले, म्हणून तिला वज्रेश्वरी हे नाव मिळाले.
नदीकाठावरील एका टेकडीवर असलेले वज्रेश्वरी देवीचे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याभोवती मोठा कोट आहे. पेशवाईचा उदयापर्यंत येथील मंदिर खूपच लहान होते. वसईचा किल्ला काबीज झाल्यावर चिमाजी आप्पांनी स्वतःच्या देखरेखीखाली हे मंदिर बांधले, असे सांगितले जाते. सभामंडपाचा भाग बडोद्याचे श्रीमंत खंडेराव महाराज गायकवाड यांनी, तर पायऱ्या व दीपमाळ नासिकचे प्रसिद्ध सावकार नानासाहेब चांदवडकर यांनी बांधली. सभामंडप व दोन गाभारे असे मंदिराचे तीन भाग आहेत. प्रमुख गाभाऱ्यात पाच मूर्ती आहेत. त्यांत मध्यभागी वज्रेश्वरी, तिच्या उजव्या बाजूला सावित्री-सरस्वती आणि डाव्या बाजूला लक्ष्मी-भार्गव यांच्या मूर्ती आहेत. दुसऱ्या गाभऱ्यात गणपती, वेताळ, कालभैरव इत्यादींच्या मूर्ती आहेत. चैत्र महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. मंदिराच्या व्यवस्थापन-खर्चासाठी वसई व भिवंडी ह्या तालुक्यांतील प्रत्येकी तीन अशी सहा गावे पेशव्यांनी इनाम दिलेली आहेत. १८७० मधील इंग्रज-मराठा चकमक वज्रेश्वरीजवळच झाली होती.
शुर्पारक प्रांतात पोर्तुगीजांनी उच्छाद मांडला होता. वसईला त्यांच्या जाचातून मुक्त करण्याची जबाबदारी बाजीरावांनी आपले धाकटे बंधू चिमाजी आप्पा यांच्यावर सोपवली. चिमाजी आप्पांनी वसईवर स्वारी करून वसईच्या भुईकोट किल्ल्याला धडक दिली. पण पोर्तुगिजांनीही कडवा प्रतिकार केला. पेशवे हतबल झाले. तेव्हा चिमाजी आप्पांनी वज्रेश्वरीला नवस केला. त्यानंतर १६ मे १७३९ रोजी पेशव्यांनी वसई काबीज केली. त्याच वर्षी नवस फेडण्यासाठी चिमाजी आप्पांनी ६ ऑगस्टला वज्रेश्वरी मंदिराच्या जिणोर्द्धाराचं काम हाती घेतलं. सध्याचं किल्लावजा मंदिराचं काम पेशव्यांनीच केलं. मंदिराचं काम सुरु झाल्यानंतर चिमाजी आप्पांची प्रकृत्ती ढासळून त्यांचं १७ ऑगस्ट १७४० मध्ये पुण्याला निधन झालं. पुढे हे काम नानासाहेब पेशव्यांनी पूर्ण केलं. टेकडीवर किल्ल्याची तटबंदी असलेला भव्य मंदिराचा निसर्गरम्य परिसर, जवळून वाहणारी तानसा नदी आणि गरम पाण्याची कुंडे वज्रेश्वरीतील मुख्य आकर्षणं आहेत. मंदिराचं भव्य आवार दगडी तटबंदीने बांधलेलं आहे. मंदिरात प्रवेश करतानाच दर्शनी भागात भला मोठा नगारखाना दिसतो. गाभाऱ्यात वज्रेश्वरी, रेणुका आणि रुक्मिणी अशा तीन देवींच्या मूर्ती आहेत. मराठ्यांच्या विजयाचं प्रतीक असलेला विजय स्तंभ तिथे आहे. म्हणूनच दररोज हजारो भाविक नवसासाठी येत असतात. देवीच्या कठड्यावर ठोकलेली चांदीची नाणी त्याची साक्ष देतात.
भिवंडी तालुक्यात असलेलं वज्रेश्वरी मुंबईपासून ८० किलोमीटर, ठाण्याहून ४० किलोमीटर तर वसई-विरारहून २५ किलोमीटर अंतरावर आहे. ठाणे आणि वसई-विरारहून इथे येण्यासाठी एसटी तसंच रिक्षांची चांगली सुविधा आहे.
-Sachin Borse
Leave a Reply